जारीकोट; पुढारी वृत्तसेवा: धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी परिसरातील चोंडी या गावच्या शिवारामधून जवळपास १२ फूट लांबीचा अजगर सर्पमित्रांनी पकडला. या अजगराने एक शेळीला शिकार बनविले होते. शेतकऱ्याने त्वरित सर्पमित्रांना फोनवरून माहिती दिली. शर्थीच्या प्रयत्नानंतर अजगराला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.
तालुक्यातील जारीकोट येथून जवळच असलेल्या गोदावरी नदी परिसरातील चोंडी गाव शिवारात शनिवारी (दि.८) अजगराने शिरकाव केला. ज्ञानेश्वर घंटेवाड यांच्या शेळीलाभक्ष्य बनविले. अजगर शेळीला गिळत असताना दत्ता कदम यांनी सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांना फोन करून याची माहिती दिली.
क्रांती बुद्धेवार यांनी वनरक्षक शेख, विश्वांभर पुयड व संदीप गौरकर यांच्यासमवेत जाऊन त्यांनी अजगर पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हा अजगर १२ फूट लांब असल्याची माहिती सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी दिली. अजगराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. याकामी व्यंकट भोसले, श्रीनिवास नरवाडे, ओमकार कदम, प्रमोद कदम, नागेश विभूते यांची मदत झाली.
गेल्या महिनाभरात धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अजगर आढळण्याचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात मागच्या महिनाभरात ६ अजगर सापडले आहेत. सर्पमित्र अजगरास पकडून वनविभागाच्या स्वाधीन करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे साप दिसल्यास त्यास न मारता वनविभाग किंवा सर्पमित्रास कळविण्याचे आवाहन सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी केले आहे.
हेही वाचलंत का ?