दीडशे अधिकारी घडूनही स्पर्धा परीक्षा केंद्र पडले बंद ! मनपा प्रशासनाची उदासिनता | पुढारी

दीडशे अधिकारी घडूनही स्पर्धा परीक्षा केंद्र पडले बंद ! मनपा प्रशासनाची उदासिनता

सूर्यकांत वरकड : 

नगर :  गरीब, हुशार विद्यार्थ्यांना चांगले करिअर करता यावे, यासाठी महापालिकेनेे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. 11 वर्षांत केंद्रातून दीडशेच्या आसपास मुलांना शासकीय नोकर्‍या लागल्या. त्यातील काही श्रेणी एकचे अधिकारी झाले. परंतु, अधिकारी घडविणारी ही संस्था केवळ बंद झाली नाही, तर पदाधिकारी अन् प्रशासनाच्या उदासिनतेमुळे महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगर महापालिकेने 5 एप्रिल 2007 रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या इमारतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. हा उपक्रम राबविणारी राज्यातील नगर ही पहिलीच महापालिका होती.

त्यासाठी इमारतही बांधली. त्याला स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र असे नाव देण्यात आले. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी या प्रकल्पाचे संचालक म्हणून 11 वर्षे काम पाहिले. शीला शिंदे महापौर असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या केंद्रासाठी नवीन वास्तू बांधण्यात आली. परंतु, प्रा. एन. बी. मिसाळ यांच्यानंतर केंद्राला चांगला संचालक मिळाला नाही. तेव्हापासून केंद्र बंदच आहे.
मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी स्पर्धा केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तोही मागे पडला. केंद्र चालविण्यासाठी दरमहा अवघा 67 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, महापालिकेनेही कोणत्याच अर्थसंकल्पात केंद्रासाठी निधीची तरतूद केली नाही. आता मनपा प्रशासनाने स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारतच मार्केट विभागाकडे वर्ग केली आहे. त्यात आता केंद्र सरकारच्या कौशल्य विकास प्रकल्पाने स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीची मागणी केली आहे. तसे पत्र मनपाला पत्र झाले आहे. त्यामुळे मनपाच्या यादीतील स्पर्धा परीक्षा केंद्र इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गरीब विद्यार्थ्यांसाठी करिअरचा रस्ता
मनपाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश परीक्षा घेऊन दरवर्षी 60 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असे. 11 वर्षांत 660 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्यातील सुमारे दीडशे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत. कोविड काळानंतर सर्वकाही सुरळीत सुरू झालेले असताना हे केंद्र बंद असल्याने विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. खासगी केंद्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे हे केंद्र त्यांच्यासाठी करिअरचा रस्ता होते.

 

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास प्रकल्पाकडून स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत देण्याबाबत प्रस्ताव आला आहे. तो प्रस्ताव नेमका काय आहे, हे तपासून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. तरीही आमचा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
                                          – डॉ. पंकज जावळे, आयुक्त, महानगरपालिका

 

मार्गदर्शन घेऊन यशस्वी झालेले उच्चपदस्थ विद्यार्थी 
विक्रीकर अधिकारी पदाच्या परीक्षेत अनंत भोसले व डॉ. सुहास नवले हे विद्यार्थी पहिले आले होते. भाऊसाहेब ढोले (अपर पोलिस अधीक्षक), वैशाली आव्हाड (तहसीलदार), डॉ. सचिन एकलहरे (मंत्रालय सहायक), वर्षा शिंदे (पोलिस उपनिरीक्षक), सागर डापसे (सहायक गुप्तवार्ता अधिकारी), डॉ. सचिन धस (सहायक आयुक्त), डॉ. शिवाजी पवार (सहायक पोलिस आयुक्त) आदी विद्यार्थी येथे मार्गदर्शन घेऊन यशस्वी झाले आहेत.

Back to top button