पानगाव (मराठवाडा) : पुढारी वृत्तसेवा – लावलेल्या झाडाचा फलधारणा होईपर्यंत जीवनप्रवास किती प्रदीर्घ असतो. त्याचा निरपेक्ष परोपकार तर शब्दात सांगता येत नाही. त्याच्याशी तिथल्या माणसांचे नाते जिव्हाळ्याचे असते अशा झाडाचे काही घावात अन काही मिनिटांत तुकडेही करता येतात. तथापि संतसज्जनाची शिकवण जगण्यात उतरवणाऱ्या पानगावकरांनी मात्र तुकोबाच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' अंगिकारले अन् तब्बल ३० वर्षांचे नारळाचे जुने झाड न तोडता त्याचे दुसऱ्या जागेत स्थलांतर करुन त्याला जीवनदान दिले.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, मराठवाड्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पानगांवात ९ व्या शतकातील चालुक्य कालीन हेमाडपंथी विठ्ठल-रुक्मीनीचे मंदीर आहे. या मंदीराला चहूबाजूंनी घरांचा वेढा असल्याने मंदिराचा कळस सोडला तर जवळ जाईपर्यंत संपूर्ण मंदिर दृष्टीस पडत नव्हते.
या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला अन् सारेच गाव या विधायक कार्यासाठी पुढे आले. मंदिराशेजारील बारा घरे मोबदला देत हटविण्यात आले. मंदिरालगतचा परिसर सुशोभित करत असताना एक तीस फूट उंचीचे फळांनी लगडलेले नारळाचे झाड मधोमध होते. एकाने झाड न तोडता त्याचे दुसरीकडे रोपन करावे अशी विनंती केली त्यास उपस्थितांनी होकार दिला आणि मग झाड वाचविण्याकरिता लगबग सुरु झाली. याकरिता मुळासकट झाड उपटण्या करिता लागणारे पोकलेन यंत्र ( हायड्रा ) हे पन्नगेश्वर कारखाण्यातून मागविण्यात आले. झाडांच्या चहूबाजूंनी मुळापर्यंत जेसीबीने खोदले गेले तसेच ज्या ठिकाणी झाड रोपन करायचे होते, तेथे दहा ते पंधरा फूट खोल खड्डा खोदला गेला.
हायड्रा मशीनने फळ असलेले झाड मुळासकट अलगद उचलून त्याचे दीडशे फूट लांब जागेत खोदलेल्या जागेत पुन्हा जशेच्या तसे रोपन करण्यात आले. याकरिता सुमारे दहा हजारांचा खर्च व शेकडो गावकऱ्यांची मेहनत कामी आली आहे. एक झाड तोडण्यापासून वाचवण्याचे काम आमच्या हातून पांडूरंगांने घडवून आणले अशी कृतज्ञता गावकऱ्यांनी व्यक्त केली.