

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शेतीची वाटणी करण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जैतानेच्या मंडळ अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी याच कामासाठी या मंडळ अधिकाऱ्याने आठ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला होता. त्यानंतर दुसरा टप्पा स्वीकारत असताना उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी या मंडळ अधिकाऱ्याला आज (दि. २१) बेड्या ठोकल्या. (Bribe)
तक्रारदार शेतकऱ्याची साक्री तालुक्यातील भामेर शिवारात शेतजमीन आहे. ही शेतजमीन त्यांना त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्यात नावे वाटणी करायची असल्याने त्यांनी निजामपूर भागाचे मंडळ अधिकारी विजय बावा यांच्याशी दि. २३ मार्च २०२३ रोजी भेट घेतली. यावेळी तक्रारदार यांच्याकडे शेत जमिनीची वाटणी करून देण्यासाठी १८ हजार रुपये लाचेची मागणी केली. यापैकी आठ हजार रुपये घेऊन त्यांनी लागलीच काम करून देतो असे आश्वासन देखील दिले. मात्र, अडीच महिने उलटून देखील बावा यांनी शेत जमिनीचे वाटणीचे काम केले नाही. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांनी पुन्हा मंडळ अधिकारी बावा यांची भेट घेतली. (Bribe)
यावेळी त्यांनी उर्वरित दहा हजार रुपये लाचेची मागणी पुन्हा केली. यानंतर तक्रारदाराने धुळ्याच्या लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानुसार उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता मंडळ अधिकारी बाबा यांनी वाटणी करण्यासाठी एकूण १८ हजार रुपयाची मागणी केल्याची बाब उघडकीस आली. तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यापैकी अगोदर स्वीकारलेले आठ हजार रुपये वजा जाता उर्वरित सात हजार रुपये देण्याची मागणी बावा यांनी केली. त्यानुसार ही रक्कम तक्रारदार यांच्या भामेर येथील निवासस्थानी देण्याचे ठरले. यानंतर उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम,शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे ,प्रशांत बागुल ,संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला आदी कर्मचाऱ्यांसह सापळा रचला. यानंतर मंडळ अधिकारी बावा यांनी तक्रारदार यांच्या निवासस्थानी ७००० रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले .या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा;