अमरावती : लाचप्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक गजाआड | पुढारी

अमरावती : लाचप्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक गजाआड

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : आजारपणातील वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्विकारणा-या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २१) गजाआड केले. कनिष्ठ लिपिक रुपेश प्रताप सिंग ठाकूर (३३) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी तक्रारदार हे मानोली येथील भगवंतराव महाकाळ व कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. त्यांचे वडील प्रल्हाद महादजी महाकाळ यांवर मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. उपचाराचे ३ लाख ३७ हजार ९१८ रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूतीचे बिल महाकाळ यांनी सादर केले होते. मात्र या बिलाच्या मंजुरीसाठी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर यांनी महाकाळ यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबतची तक्रार एसीबीला प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीमध्ये लिपिक रुपेश ठाकुरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी रुपेश ठाकुर यांनी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक विभागाच्या कक्ष क्रमांक ४ मध्ये सापळा रचून रुपेश ठाकुरला १३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत, पोलिस निरीक्षक योगेशकुमार दंदे, योगेशकुमार दंदे, अमोल कडू, पोलिस हवालदार नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू, चालक पीएसआय सतीश किटुकले, पोलिस हवालदार चंद्रकांत जन्मबंधू यांनी केली.

Back to top button