

Widespread incidence of diseases on soybean
औसा, पुढारी वृत्तसेवा औसा तालुक्याच्या गेल्या काही दिवसांपासून काही भागात दररोज रिमझिम पाऊस पडतोय तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भागातील शेतकरी फवारणीत गुंतला आहे.
तालुक्यात ७४ हजार ८९२ हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. सोयाबीनला नगदी पीक म्हणुन घेतले जाते. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर सध्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांना महागडी औषधे फवारणीसाठी खरेदी करावी लागत आहेत सोयाबीनवर पडलेल्या किडीमुळे उत्पन्न किती निघेल पुढे पाऊस कसा पडेल याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असतानाच उसनवारी करून शेतकरी फवारणी करीत आहेत.
सोयाबीन फवारणीसाठी सध्या एकरी आठशे रुपये ते हजार चे औषध आणि मजुरी पाचशे रुपये अशी एकूण एकरी दीड हजार खर्च अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला परवडणारा नाही. सध्या सोयाबीन फुलांच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव झाला तर उत्पादनात घट होते म्हणून शेतकऱ्याना फवारणी शिवाय पर्याय नाही. औसा, बुधोडा आणि आलमला परिसरात मागील चार दिवसापूर्वी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर दररोजच पाऊस आहे.