

Nilanga Kureshi community Farmers March
निलंगा : निलंगा येथे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी आणि कुरेशी समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी काळ्या पट्ट्या बांधून शासन आणि तथाकथित गोरक्षकांचा निषेध केला.
मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पशुसंवर्धन मंत्री, मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही काळात जनावरे खरेदी-विक्रीवर बंदी आणि तथाकथित गोरक्षकांच्या कारवायांमुळे शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी समाज त्रस्त झाला आहे. कायद्याने गाई कत्तल करण्यास बंदी असली तरी, अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केल्याचा आरोप करण्यात आला. कुरेशी समाजाने स्पष्ट केले की, त्यांच्या धर्मात गाई कत्तल निषिद्ध आहे आणि ते कायदेशीर व्यवसाय करतात.
तथाकथित गोरक्षकांकडून अधिकृत कागदपत्रे असतानाही जनावरे जप्त केली जातात, आणि त्यानंतर त्या जनावरांची अनधिकृत विक्री केली जाते, असा आरोप करण्यात आला. पोलिसांनी अनधिकृत धंद्यांवर कारवाई करावी, अधिकृत जनावरे जप्त करण्याचा अधिकार गोरक्षकांना कसा मिळाला, असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर यांनी उपस्थित केला.
देशातील मोठ्या बीफ कंपन्या बहुजन किंवा अल्पसंख्याक समाजाच्या मालकीच्या नसून, तिथे मोठ्या प्रमाणावर गाई कत्तल केली जाते आणि बीफ एक्स्पोर्ट केला जातो, असा आरोप करण्यात आला. फक्त शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजावर कारवाई का होते, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत असताना लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल आंदोलकांनी केला. निवडणुकीपूर्वी आश्वासने देऊन निवडून आल्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान, जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ, काँग्रेसचे हमीद शेख, मुजीब सौदागर, डॉक्टर हिरालाल निंबाळकर, गायकवाड तात्या, गणेश मामा जाधव, कुरेशी समाजाचे अध्यक्ष शफीक कुरेशी, उपाध्यक्ष महेबुब कुरेशी, सचिव जहिर कुरेशी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.