

लातूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकत्यांनी रविवारी (दि.२०) सायंकाळी पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. त्यांनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी लातूर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळ संभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रविवारी (दि.२० ) व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ छावा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लातूर येथील विश्रामगृहात पोहोचले. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती. पत्रकार परिषद झाल्यानंतर सुनिल तटकरे विश्रामगृहातील हॉलमध्ये गेले असता त्या ठिकाणी छावाचे कार्यकर्ते गेले व त्यांनी मंत्री कोकाटे यांच्याविरोधात रोष व्यक्त करत तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये व 'छावा'च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले व ते लातूर पोलिस ठाण्यासमोर एकवटले.