

लातूर : शासनाने बंदी घातलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहन व गुटखा असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई 8 जानेवारी रोजी करण्यात आली. यातील आरोपी फरार झाला आहे.
उदगीर शहरातील उमा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान एका कारमधून प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली उमा चौक परिसरात पोलिसांच्या पथकाचा सापळा रचण्यात आला.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पांढऱ्या रंगाची कार एमएच 24 एएफ 4600 आल्यानंतर पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने एका ठिकाणी गाडीला धक्का देऊन गल्लीबोळातून पोबारा केला. पोलिसांनी कारमधून प्रतिबंधित असलेला 4 लाख 9496 रुपयांचा गुटखा आणि कार असा एकूण 11 लाख 9496 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी माधव तुकाराम मोरे (वय अंदाजे 32, रा. जांब बु., ता. मुखेड, जि. नांदेड) याच्याविरुद्ध पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली.