

कन्नड : शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच शाळेच्या 100 मीटर परिसरात विक्रीस मनाई असलेल्या सिगारेट व बिडीच्या अवैध साठवणूक व विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 8 लाख 39 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 8 जानेवारी रोजी रात्री 9.48 वाजता करण्यात आली.
सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस सपोनि कुणाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक डोईफोडे, कैलास निंभोरकर, नीलकंठ देवरे, पो. ना. गायकवाड या पोलिस पथकाने शहरातील गार का बंगला परिसरात छापा टाकला.छाप्यावेळी शेख जमील शेख मुस्ताक व शेख खलील शेख मुस्ताक दोघेही रा. गार का बंगला, हे त्यांच्या राहत्या घरात अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, बिडी व सिगारेटची साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले.
संबंधित ठिकाण इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, काजी मोहल्ला, माळीवाडा कन्नड येथून अवघ्या 100 मीटर परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.पोलिसांनी पंचनामा करून विविध कंपन्यांचे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आणि काहभ सिगारेटचे बॉक्स तसेच विक्रीतून मिळालेले 2 लाख 99 हजार 10 रुपये रोख असा एकूण 8 लाख 39 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.औषध प्रशासन व अन्न सुरक्षा विभागास देण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.