

लातूर : महावितरणच्या लातूर मंडळात लघुदाब वर्गवारीतील 4 लाख 44 हजार 412 वीजग्राहकांकडे 117 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांवर महावितरणने वसुली मोहीम अधिक तीव्र केली असून वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांना पुनर्जोडणीचा दंड भरण्यापासून वाचायचे असेल तर देय तारखेच्या आत आपले वीजबील थकबाकीसह भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
लातूर मंडळात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक व इतर वर्गवारीतील 4 लाख 44 हजार 412 ग्राहकांकडे 117 कोटी 88 लाख रूपये वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये उदगीर विभागातील आज अखेर 1 लाख 41 हजार 881 वीजग्राहकांकडे 45 कोटी 11 लाख रूपये थकबाकी आहे. तर निलंगा विभागातील 1 लाख 702 वीजग्राहकांकडे 20 कोटी 44 लाख रूपये थकबाकी आहे. त्याचबरोबर लातूर विभागातील 2 लाख 1 हजार 829 वीजग्राहकांकडे 52 कोटी 33 लाख रूपये थकबाकी आहे.
वारंवार आवाहन करूनही गेल्या 9 दिवसात घरगुती ग्राहकांनी 6 कोटी 79 लाख तसेच व्यावसायिक ग्राहकांनी 2 कोटी 4 लाख, औद्योगिक ग्राहकांनी 1 कोटी 22 लाख व इतर वर्गवारीतील 29 लाख रूपयांचे वीजबील भरले आहे. मागणीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याने थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच जात आहे.
महावितरणने ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपद्वारे कधीही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट-कॅश कार्ड, मोबाईल वॅलेटव्दारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असल्यास पुर्नजोडणी शुल्कापोटी सिंगल फेजसाठी 310 रुपये, थ्री फेजसाठी 520 रुपये व अधिक जीएसटीसह भरावे लागतात. ही पुर्नजोडणी शुल्कही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.