

Two gutkha mafia members arrested from Latur district
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कारवाई करूनसुद्धा गुटखा विक्री सुरुच ठेवणाऱ्या अहमदपूर पोलिस ठाणे हद्दीतील दोन गुटखाविक्रेत्यांवर तडीपारीची कार्यवाही करण्यात आली करण्यात आली आहे. राजू ऊर्फ शिवलिंग हामने, (रा. भाग्यनगर, ता. अहमदपूर) व आकाश बालाजी कोटगीर, (रा. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी त्यांची नावे आहेत. गुटखा विक्रेत्यावर तडीपारीची ही जिल्ह्यातील पहिलीच कार्यवाही असून यास अन्न व औषध प्रशासनच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
या दोन्ही आरोपींवर मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये, गुटखा, पानमसाला तसेच सुपारीची विक्री व साठा करून त्याची अवैधरीत्या किरकोळ व घाऊक विक्री करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे वेळोवेळी प्रतिबंध करून, गुन्हे दाखल करून कारवाई करूनही त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडला नाही.
ते लपून छपून अवैध विक्री करीत असल्याने गुटखा पान मसाला बाजारामध्ये उपलब्ध होत असल्याचे वारंवार आढळून येत असल्याने तसेच त्यांच्या या अवैध व्यवसायमुळे युवा पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. याशिवाय गुटखा पान मसाला खाल्ल्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळे आजार होऊ शकतात.
हे ओळखून उपरोक्त दोन्ही आरोपींना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्यपार करणे आवश्यक होते. यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद आरोपींविरुध्द हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांनी या आरोपीविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, अहमदपूर डॉ. मंजुषा लटपटे यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव पाठवला होता.
त्याची सुनावणी झाली व २२ ऑगस्ट २०२५ ते दिनांक २२ऑगस्ट २०२६ पर्यंत लातूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदरचे हद्दपारचे आदेश प्राप्त होताच अहमदपूर पोलिसांनी आरोपींना लातूर जिल्ह्याचे हद्दीबाहेर नेऊन सोडले आहे.