

Chhawa Sanghatana's state president Vijaykumar Ghadge criticizes Ajit Pawar
लातूर, पुढारी वृत्तसेवा : कृषिमंत्री माणीकराव कोकाटे यांचा राजिनामा मंगळवारपर्यंत घेतला जाईल, मी शब्दाचा पक्का आहे, हे महाराष्ट्र जाणतो. तुम्ही निश्चिंत रहा असे आम्हाला पुणे येथील बैठकीत आश्वासित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऐनवेळी आपला शब्द फिरवुन आपण दिल्या शब्दाला जागणारे नाहीत हेच महाराष्ट्राला दाखवून दिले असल्याचा आरोप करीत ही लढाई शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे आपण आता राज्यभरातील समविचारी संघटनां व शेतकऱ्यांची मोट बांधून सरकारविरोधात एल्गार पुकारणार असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवारी (दि.३०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांच्या सुख दुखाशी यांचे काहीएक देणे घेणे नाही त्यांना सत्ता जवळची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसेल अशी त्यांना भीती असल्याने त्यांनी शब्द फिरवला असल्याच्या चर्चा असल्या तरी याचा फटकाच त्यांना बसणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
आपण आता स्वस्थ बसणार नाही ही लढाई कोण्या एका जातीची नाही तर शेतकऱ्याची आहे. शनिवार २ ऑगस्टपासून आपण या राज्यव्यापी शेतकरी संवाद दोऱ्यावर निघणार असून त्याची सुरुवात नांदेड येथून होईल. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र खानदेश आम्ही पिंजून काढणार आहोत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीनला साडेआठ हजार हमीभाव, पीक विमा या प्रमुख मागण्या राहणार असल्याचे घाडगे म्हणाले. पत्रकार परिषदेस भगवान माकणे, दीपक नरवडे, शेतकरी संघटनेचे राजू कसबे, मनोज लंगर, अरुण कुलकर्णी, तुळशीराम साळुंके, नितीन साळुंके, मनोज फेसाटे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर राजीव गांधी चौक परिसरात छावाच्या कार्यकत्यांनी अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्च्या फलकावर पत्ते उधळून यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.