

लातूर : बँकेत भरण्यासाठी दिलेली रक्कम चोरी झाल्याचा सांगणाऱ्या दोघांचा बनाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडा पाडला व आरोपींकडून साडेपाच लाख हस्तगत केले. जावेद जलील शेख (वय 27, रा. बिलाल मजीद जवळ, इस्लामपुरा लातूर) व आकाश प्रकाश ढगे (वय 30, रा. जोडजवळा, सध्या रा. लेबर कॉलनी, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.
उपरोक्त चोरीबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करण्यासंदर्भात पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी एलसीबीला निर्देशित केले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथक तपास करीत होते.
दरम्यान पथकाने मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील संशयित आरोपी जावेद शेख यास खोरी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जावेद गेल्या अकरा वर्षांपासून लातूर येथील टिळक नगरातील एका डायग्नोस्टिक सेंटर मध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. सेटरमध्ये ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी काही वेळा आरोपी जावेद शेख व त्याचा सहकारी अर्शद शेख यांच्या ताब्यात दिली जात असे. ती स्कुटरच्या डिक्कीत ठेवून बँकेत नेली जात असे.
ही बाब जावेद शेख ने त्याचा मित्र आकाश ढगे यास सांगितली. दोघांनी संगनमताने अर्शद शेख यांच्या स्कूटरची बनावट चावी तयार करून स्कूटरच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम चोरी करण्याचा कट रचला. 5 फेब्रुवारी रोजी संबंधित सेंटर ने जावेद शेख कडे 90 हजार व अर्शद शेख याच्याकडे सहा लाख रुपये बँकेत भरण्यासाठी दिले होते. दोघांनीही संबंधित रक्कम आपल्या-आपल्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर एका चहाच्या स्टॉलसमोर गाड्या उभ्या करून चहा पिण्यासाठी थांबले असता जावेद शेखने आकाश ढगेला फोनवर माहिती दिली. काही वेळाने अर्शद शेख यांची स्कूटर तेथून गायब झाली.
नंतर ती स्कूटर सेंटर समोरील बोळात आढळून आली; मात्र डिक्कीतील सहा रुपये गायब झाल्याचे आढळले दरम्यान तपासादरम्यान आरोपी जावेद शेख व त्याचा साथीदार आकाश ढगे यांनी संगनमताने बनावट चावी तयार करून चोरीचा बनाव रचून हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. चोरीची रक्कम फरार आरोपी आकाश ढगे असल्याचे जावेदने सांगितले व पथकाने त्यास जोडजवळा येथून ताब्यात घेतले. चोरीतील 6 लाख रुपयांपैकी 50 हजार रुपये खर्च केल्याचे व उर्वरित रक्कम जोडजवळा येथील त्याच्या भावाच्या घरात लपवून ठेवली असल्याचे आरोपी आकाशने सांगितले. ती रक्कम जप्त पोलिसांनी जप्त केली आहे.