

पूर्णा : महाराष्ट्राचे आराध्यदैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याची रंगरंगोटी व परिसर सुशोभीकरण न केल्याने नगर परिषद प्रशासना विरोधात शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त शिवप्रेमींनी थेट नगर परिषद कार्यालय गाठत बंद असलेल्या सीओंच्या केबिनला पुष्पहार अर्पण करून अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला.
शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. त्याआधी 4 फेब्रुवारी रोजी ज्ञानोबा कदम, विष्णू कदम, पद्माकर पांचाळ, अंगद कदम, सचिन कदम, संदीप कदम, त्र्यंबक कदम आदी शिवप्रेमींनी नगरपालिकेला निवेदन देत शिवाजी महाराज स्मारक, पुतळा व परिसराची रंगरंगोटी, स्वच्छता, विद्युत पथदिवे व आकर्षक रोषणाई करण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात पुतळ्याची कोणतीही रंगरंगोटी अथवा सुशोभीकरण करण्यात न आल्याचे शिवप्रेमींनी निदर्शनास आणून दिले. फक्त स्मारकाच्या कंपाऊंड भिंतीला रंग देण्यात आल्याची बाब समोर आली.
यामुळे प्रशासनाने केवळ औपचारिकता पार पाडल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी दुपारी शिवप्रेमी जाब विचारण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेले असता मुख्याधिकारी डॉ.उत्कृष्ट गुट्टे अनुपस्थित असल्याचे आढळले. शिवजयंती कार्यक्रमालाही ते उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांत अधिकच संतापाची भावना निर्माण झाली. याच संतापातून शिवप्रेमींनी बंद सीईओंच्या केबिन दाराला पुष्पहार अर्पण करत जाहीर निषेध व्यक्त केला.
पालिका प्रशासनाला शिवरायांविषयी गांभीर्य नाही का? असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. मात्र पोलिसांच्या समजुतीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आगामी काळात अशा प्रकारची उदासीनता सहन केली जाणार नाही, असा इशाराही शिवप्रेमींनी दिला.