

गेवराई : गेवराई शहरातील विठ्ठल नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 73 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विठ्ठल नगर येथील रहिवासी सुभाष नागरे हे दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी घराला कुलूप लावून कुटुंबासह संगम जळगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. दि. 18 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर नागरे हे तात्काळ गेवराई येथे परतले.
घरी पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 40 हजार रुपये असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत सुभाष नागरे यांच्या फिर्यादीवरून दि. 19 फेब्रुवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकासह तांत्रिक पथकांना पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.