

Silver crown of goddess at Barad missing
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
बारड येथील जागृत देवस्थान पोचम्मा देवीचा पारंपरिक आंबिल महोत्सव चांदीच्या मुकुटाविना साजरा करण्यात आल्याने भक्तांनी दान दिलेली देवीचे मुकुट कुठे गायब झाले आहे? असे प्रश्न उपस्थित करून भक्तगण चिंता करीत आहेत.
बारड येथे परंपरेनुसार दरवर्षी येथील जागृत पोचम्मा देवीची 'आंबिल' उत्सव साजरा करण्यात येतो. सालाबादप्रमाणे बैलजोडीची सजावट करून ढोल-ताशांच्या गजरात सुहासिनीच्या पारंपरिक वेशभूषेत गावातील प्रमुख रस्त्यावरून आंबिल मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पोतराज, गोंधळी यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.
भक्तिमय वातावरणात आंबिल मिरवणूक हनुमान मंदिर, मानेजी बापू मंदिर, विठ्ठल मंदिर, शिव मंदिर या प्रमुख देवस्थानांना भेट देऊन आराधना केली जाते. पहाटेच्या वेळी अकरा गुरुवर्यांच्या हस्ते मंत्रोच्चारात देवीची पंचामृताने अभिषेक महापूजा करण्यात आली. मध्यान्ह आरतीनंतर अकरा सुहासिनींना 'पातळ' वाटप करण्यात आले. यावेळी नांदेड शहरातील भक्ताने देवीला दान दिलेले पाच चांदीचे मुकुट दिसून न आल्याने भक्तगणांत आश्चर्य व्यक्त केले.
आंबिल परंपरेत पोचम्मा देवीला कुलकर्णी विश्वस्तांकडून पंचमिष्ठान भोग नैवेद्य दाखविला जातो. यामध्ये पुरणपोळी, पायस, करंजी, अनारसी आणि तांबोल नैवेद्य असतो. भक्तगणांना वाटप करण्यात येणार्या महाप्रसादात पंचमिष्ठान भोग नैवेद्य मिसळला जातो. पंचमिष्ठान भोग नैवेद्य लक्षवेधी ठरणारा असला तरी चांदीचे पंच मुकुट नसल्याने गाभार्यात सुनेसुने वाटत होते.