

Latur News
लातूर : लातूर येथून 26 मे रोजी बेपत्ता झालेल्या बालकाचा शोध पंढरपूर पोलिसाच्या सतर्कतेने आणि लातूर पोलिसांच्या तत्परतेने लागला आहे. या प्रकरणी आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली. महेश रमाकांत सुर्यवंशी असे त्याचे नाव आहे. त्याने कोणत्या कारणासाठी बालकाचे अपहरण केले याचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, 26 मे रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास गुमस्ता कॉलनी, येथील एका तीन वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात विवेकानंद पोलीस ठाण्याचे पथक तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत होते. दरम्यान, 6 जून रोजी पंढरपूर येथे एक मुल रडत असलेले तेथील एका व्यक्तीस आढळून आले. त्यांनी कोणाचे तरी मुल यात्रेत चुकले असावे असे समजून त्यास विठ्ठल मंदिरात नेले आणि पोलिसाच्या स्वाधीन केले. तिथे लाऊड स्पीकरवरून या बालकाबद्दल माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्याचे फोटो पोलिसांनी ग्रुपवर शेअर केला. लातूर येथील विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी हा फोटो पाहिला आणि पंढरपूर गाठले आणि बालकास ताब्यात घेतले.
दरम्यान, लातूरचे पथक अपहरणकर्त्याचा शोध घेत होते. गुप्त बातमीदार माहिती घेत होते. या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून, औसा येथील सिद्धेश्वर नगरात राहणारा महेश रमाकांत सुर्यवंशी याच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर येथून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने त्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
बालक सुखरूप असून त्याला त्याच्या आईकडे स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीने नेमक्या कोणत्या कारणासाठी बालकाच्या अपहरण केले होते? याचा तपास पोलीस करीत आहेत.