

'Save Vote, Save Country' rally in Nilanga on October 8
लातूर, पुढारी वृत्तसेवाः काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांची जिल्हास्तरीय संयुक्त बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ८ ऑक्टोबर रोजी निलंगा येथे 'व्होट बचाव, देश - बचाव' मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, एसआयआर प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी आणि लातूर जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करून भविष्यातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेकाप, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी यांच्यासह समविचारी संघटना सहभागी होणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, शेतमजुरांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य, चारा छावण्या, मनरेगाच्या कामांवरील अटी शिथिल करणे, सरसकट पीकविमा आणि बटाईदार शेतकऱ्यांनाही मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या.