रेणापूर तालुक्याला अवकाळीचा दुसरा तडाखा

पाचही महसूल मंडळांत अवकाळी वादळी पावसासह विजांच्या कडकडाटात गारांचा जोरदार पाऊस झाला.
renapur unseasonal rain
रेणापूर तालुक्याला अवकाळीचा दुसरा तडाखाfile photo
Published on
Updated on

Renapur Taluka Hit by Second Blow of Unseasonal Rains

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. परिणामी बुधवारी (दि.१ एप्रिल) सायंकाळी सहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत तालुक्यातील वाला, मोरवड, गरसुळी, तत्तापूर, लखमापूर, पळशी, खरोळा, चाडगाव, कामखेडा, रेणापूर, कारेपूर, पोहरेगाव, पानगाव, घनसरगाव, टाकळगाव, मुरढव, भंडारवाडी, पाथरवाडी यासह पाचही महसूल मंडळांत अवकाळी वादळी पावसासह विजांच्या कडकडाटात गारांचा जोरदार पाऊस झाला.

renapur unseasonal rain
Latur News : मजुरांअभावी शेतीच्या कामाला विलंब

सर्वत्र जमिनीवर गारांची चादर पसरली होती. या पावसाने उरली सुरली ज्वारी, गहू, करडी, हरभरा व उभा ऊस आडवा पडला. अनेक झाडे उन्मळून पडली तर शेतातील पत्र्यांचे शेड उडून गेले. वादळी वाऱ्यामुळे थोडाबहुत शिल्लक राहिलेल्या आंबा फळबागांची फळगळ झाली. गेल्या महिन्यात २३ फेब्रुवारीलाही अशाच प्रकारे अवकाळी गारांचा वादळी पाऊस झाला होता.

त्यात १२ हजार १३० शेतकऱ्यांच्या ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. वाधित शेतकरी व क्षेत्राच्या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तहसील प्रशासनाकडून तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे, असे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी सांगितले.

renapur unseasonal rain
Unseasonal rainfall impact Jalna : रब्बी पिकांसह खरबूज, टरबुजांचे मोठे नुकसान

भारतीय हवामान विभागाने लातूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. ती कालच्या पावसाने खरी ठरली आणखी पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (दि.१ एप्रिल) अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फिरले असून त्यांची चिंता वाढली आहे. बहुतांश पिके आडवी पडली आहेत. तसेच आंब्याला लागलेली फळे चक्क गळून पडली आहेत. गारांचा अक्षरशः वर्षाव होऊन शेतावर पांढरी चादर पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. काही शेतकऱ्यांनी रब्बीची पिके शेतावर काढून टाकली होती ती पावसात भिजून खराब झाली आहेत.

गहू, जवारी, हरभरा, ऊस यांसह अन्य पिके आडवी पडल्याने ती अक्षरशः मातीमोल झाली आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत मात्र अद्यापही बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे करूनही शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील २७ गावांतील १२ हजार १३० शेतकऱ्यांच्या ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रा-वरील जिरायती पिकांचे ८ हजार २५ हेक्टर, बागायती पिकांचे ६९३ हेक्टर तर ३५ हेक्टर वरील फळबागांचे मोठे नुकसान होऊन त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यानंतर परत १ एप्रिल रोजी वादळी गारांचा पाऊस झाला त्यात उरली सुरली सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे आणखी नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news