

Agricultural work delayed due to a shortage of laborers.
विठ्ठल कटके
रेणापूर : गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अवकाळी गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने लातूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतीकामांसाठी मजुर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनाच शेतीची कामे करावी लागत आहेत. परिणामी रब्बी पिकाच्या काढणीला विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील महिन्यात (२३ फेब्रुवारी) रेणापूरसह खरोळा, राजेवाडी, पोहरेगाव, मोटेगाव, समसापूर नेहरूनगर, कोळगाव व इतर ठिकाणी अचानकपणे वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस होऊन रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, आंबा, द्रांक्ष, पालेभाज्या व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांचे शेड वाऱ्यांने उडून गेले. तर अनेक झाडे उन्मळून पडली.
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून त्यांचा एकच धांदल उडाली होती. बहुतांश पिके आडवी पडली आहेत. तसेच आंब्याला लागलेला तोर गळून पडला. द्राक्षांचेही नुकसान झाले. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा अक्षरशः वर्षाव होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला.
रब्बीची पीके शेतावरच पावसात भिजून खराब झाली. गहू, जवारी, हरभरा, ऊस यासह अन्य पिके आडवी पडली. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. यातून अद्याप शेतकरी सावरलेला नसतांनाच परत भारतीच हवामान विभागाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्यामुळे उरलीसुरली पिके हाती लागतील की नाही या संभ्रमात शेतकरी पडला आहे. मागील चार पाच दिवसांपासून रेणापूर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून मराठवाड्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस पडतो आहे. गहू, ज्वारी ही पिके कापणीसाठी आलेली असतानाच तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची पिके आडवी पडली. त्यात उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. आडवी पडलेली पिके काढावीत कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील २७गावांतील १२ हजार १३० शेतकऱ्यांच्या ८ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे ८ हजार २५ हेक्टर, बागायती पिकांचे ६९३ हेक्टर तर ३५ हेक्टर वरील फळबागांचे मोठे नुकसान होऊन त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, त्यात प्रशासनाने पंचनामेही केले. परंतु अद्याप या शेतकऱ्यांना शासनाकडून कसलीच मदत मिळाली नाही.
केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाढलेली मजुरी, खते, बियाणे व कीटकनाशकांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतीपुरक साहित्याच्या किमती जशा वाढत आहेत. तसे शेतीमालाचे भाव मात्र वाढत नाहीत, बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.