

जालना ः गत आठवड्यापासून पडत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्हाभरातील सुमारे रब्बी हंगामातील बाराशे हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. दि. 1 ते 4 या कालावधीत येलो अलर्ट जारी करण्यात आल्याने पुन्हा एकदा जालना, घनसावंगी, अंबड, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात वीजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील आन्वा, जळगाव सपकाळ या ठिकाणी गारपीट झाली. यामुळे सोंगणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
घनसावंगी तालुक्यात बुधवार, दि. 1 रोजी सायंकाळी 5 वाजता अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके अक्षरशः आडवी झाली.
गहू, हरभरा, ज्वारी या प्रमुख पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीस तयार असलेली पिके पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी रस्ते अडथळले गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला. शेतीवरील खर्च, कर्जाचे ओझे आणि आता झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
अंबड तालुक्यातील शहापूरसह परिसरात बुधवार, दि. 1 रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला आहे. शहापूरसह परिसरातील धाकलगाव, बारसवाडा, दाढेगाव, शोभानगर ,पिठोरी सिरसगाव आदी भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी आदींसह फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
डोणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
डोणगाव ः जाफराबाद तालुक्यातील डोणगांव परिसरामध्ये बुधवार, दि. 1 रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यामुळे शेतात सोंगून ठेवलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शिवाय, भाजीपाला पीक ऐन जोमात असतनाच अवकाळी पावसाने कहर केला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. गहू, शाळू ज्वारी, हरभरा, द्राक्ष, आंबा, कांदा, उन्हाळी बाजरी, मका आदींसह पिकांसह भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना मदत द्यावी ः मोहिते
सलग दुसऱ्या आठवड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी युवा सेना लोकसभा अध्यक्ष गणेश मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे केली आहे. गणेश मोहिते यांनी म्हटले आहे की, बुधवारी ( दि. 1) झालेल्या अवकाळी पावसाचा जालना तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगलाच फटका बसला आहे.