

रेणापूर : मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात जून - जुलै या महिण्यात २३६ मिमी पाऊस पडला पाहिजे परंतु केवळ ११३.५ मीमी एवढाच पाऊस झालेला आहे. ऑगस्ट महिण्याचा तिसरा आठवडा संपत आला मात्र एकही थेंब पाऊस पडला नाही. त्यामुळे रेणापूर तालुक्यात कमालीची तुट झाल्याचे दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके सुकून त्यांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे खरिपाची पिके हातातून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या शेवटी झालेल्या मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला होता. या दमदार पावसाने पिकांच्या माना उंचावल्या होत्या. पडलेला पाऊस हा पिकांसाठी जणू संजीवनीच ठरला होता परंतु पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहेत.
तालुक्यात खरोळा - हरवाडी परिसरातील रखडलेल्या पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. अगोदरच सोयाबीनच्या पेरणीला तब्बल एक महिना उशीर झाला होता आता उगवलेले सोयाबीन कितपत शेतकऱ्यांच्या हाती लागेल याबाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे. मागील दमदार पावसाने शेतकरी सुखावला होता आता हमखास पीक पदरात पडतील अशी आशा शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु आता शेतकरी धास्तावला आहे. प्रशांत महासागरातील " एल निनो " ची स्थिती ऑगष्ट मध्ये व सप्टेंबर महिन्यात मध्यम राहिल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस पडेल की नाही काळजी लागली आहे.
ऑगष्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पावसाची तुट निर्माण झाली आहे. राज्यात सर्वाधिक तुट झालेल्या जिल्ह्या मध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश असल्याने अधिकच चिंता वाढत चालली आहे. अद्यापही रेणा व व्हटी प्रकल्पात पाणीसाठा वाढलेला नाही अल्पसा पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते की काय अशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे.
रेणापूर तालुक्यात दररोज ढगाळ वातावरण निर्माण होते पाऊस मात्र पडत नाही केवळ ढगाकडे पाहून पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. तालुक्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने उद्याड दिल्याने कांही भागात पेरण्या रखडल्या होत्या आता त्या पुर्ण झाल्या आहेत. तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. शेतकऱ्यांसाठी हे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी सोयाबीन याच पिकाला अधिक प्राधान्य देत आहेत.
दरवर्षी या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असून या वर्षीहि सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे रेणा व व्हटी प्रकल्पात जलसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता अजुनही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मोठा पाऊस झाला तरच रब्बीच्या पेरण्या होतील. अशा स्थितीत रब्बीच्या क्षेत्रावर दुष्काळाचे सावट पसरते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.