Beed bribery case : ७० हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ जाळ्यात

अनधिकृत वाळू उपसा व हायवा वाहतुकीला ‘अभय’ देण्यासाठी १ लाख ७० हजारांची मागणी; तलाठी संघटनेच्या अध्यक्षावर कारवाई
Beed bribery case
Beed bribery casepudhari photo
Published on
Updated on

गेवराई : अनधिकृत वाळू उपसा आणि हायवा वाहतुकीला सुरळीतपणे ‘परवानगी’ देण्यासाठी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ७० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. म्हाळजपिंपळ येथील तलाठी तथा तलाठी संघटनेचे अध्यक्ष विलास मोराळे यांच्यावर झालेल्या या कारवाईने गेवराईच्या महसूल प्रशासनाची पोलखोल झाली आहे.

म्हाळजपिंपळ परिसरात अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे प्रकरण असतानाच त्याकडे कारवाई करण्याऐवजी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांना ‘सुरळीत’ मार्ग करून देण्यासाठी तलाठी मोराळे यांनी तक्रारदाराकडे १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली.

Beed bribery case
Dr.Sampada Munde education loan : डॉ. संपदा मुंडेंच्या शिक्षणाचे कर्ज साहित्यिक विश्वास पाटलांनी फेडले

७० हजारांचा पहिला हप्ता घेताच एसीबीचा छापा

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गेवराई शहरातील बेदरे कॉम्प्लेक्स परिसरातील एका खासगी कार्यालयात ७० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच विलास मोराळे एसीबीच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. वाळूमाफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अधूनमधून कारवाया केल्या जातात; मात्र कारवाई करणाऱ्या यंत्रणेतीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असतील, तर या कारवायांचा परिणाम किती होणार, हा प्रश्न आहे. ‘कुंपणच शेत खात असेल तर शेताचे रक्षण कोण करणार?’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

या प्रकरणात लाचेची मागणी नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून झाली, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीच्या मागे असलेले मुख्य सूत्रधार कोण, याचाही तपास होणे गरजेचे आहे.

‘हप्ते’ घेणाऱ्यांवरच नाही, तर वाळूमाफियांवरही कारवाई कधी?

एसीबीने लाचखोर तलाठ्याला पकडल्याने महसूल प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. मात्र या कारवाईपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता ज्या वाळूमाफियांसाठी हा कथित ‘हप्ता’ मागण्यात आला, त्यांच्या अवैध वाळू उपशाचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

वाळूमाफियांना महसूल यंत्रणेतीलच काही घटकांकडून संरक्षण मिळत असेल, तर केवळ वाहनांवर कारवाई करून वाळू तस्करी थांबणार नाही. लाच घेणारा कर्मचारी आणि त्याला लाच देऊन अवैध धंदा चालवणारा वाळूमाफिया, दोघांवरही कठोर कारवाई झाली तरच वाळू तस्करीच्या मुळावर घाव घालता येईल. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह ?

वाळू उपसा, वाहतूक आणि महसूलविषयक कारवाईच्या प्रक्रियेत तलाठ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे तलाठ्यालाच वाळू वाहतुकीला ‘अभय’ देण्यासाठी लाच घेताना पकडले जाणे ही केवळ एका कर्मचाऱ्यावरील कारवाई न मानता महसूल यंत्रणेतील देखरेख आणि नियंत्रण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.

वाळूमाफियांनी कारवाईचा धाक की ‘हप्त्यांचा’ आधार?

गेवराई तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. वाळूमाफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महसूल यंत्रणेतीलच एखादा कर्मचारी जर लाचेच्या माध्यमातून अशा अवैध वाहतुकीला ‘सुरळीत’ करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर वाळू तस्करीला आळा कसा बसणार, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news