

Renapur : Navratri festival begins; Palkhi procession on Dussehra day
रेणापुर, पुढारी वृत्तसेवाः रेणापूरच्या ग्रामदैवत श्री रेणुका देवी मंदिरात सोमवारी (दि. २२) दुपारी विधिवत घटस्थापना पार पडली. मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष व तहसीलदार प्रशांत थोरात, विश्वस्त मंडळाचे कार्याध्यक्ष राम पाटील व पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करून देवीची पूजा संपन्न झाली. या मान्यवरांच्या हस्ते घटस्थापनाही करण्यात आली मंदिराचे पुजारी राजू धर्माधिकारी यांनी पौरोहित्य केले. उपस्थित ग्रामस्थ व भाविक भक्तांनी "आई राजा उदो उदो" आणि "रेणुका माता की जय" चा जयघोष केला.
यावेळी ट्रस्टी तुकाराम कोल्हे, रमाकांत वाघमारे, म.श. हलकुडे, माजी सरपंच विठ्ठल कटके, अॅड प्रशांत आकनगिरे, दिलीप आकनगिरे, पुंडलिक इगे, मनोहर व्यवहारे, गुरुसिद्ध अप्पा उटगे, शहाजी कातळे, राजू पुनपाळे, रावसाहेब राठोड, बालाजी कदम, मंडळ अधिकारी गायकवाड, गोविंद शिंगडे, दिलीप देवकते, महेश हिप्परगे, कमलाकर तिडके, रेनापूरचे तलाठी अशोक बुबने, गोंधळी दत्ता जाधव, आर्चक घडसे कुटुंब गुरव कुटुंब यांच्यासह रेणापूर येथील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, ग्रामस्थ व भाविक भक्तांची उपस्थिती होती.
श्री रेणुका देवी मंदिरात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार असून २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होणार आहे. यंदा दहा दिवस पारंपरिक कार्यक्रम व २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात आला असून सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हलती दीपमाळ, पारंपरिक नगारा आणि संबळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक येतात. दसऱ्याच्या रात्री ९ वाजता रेणापूर शहरातून शोभेची दारू उडवून पालखी मिरवणूक काढली जाईल.