Latur Crime : चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल; नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे पोलिसांचे आवाहन
Renapur assault case
खांबाला बांधुन अशा प्रकारे अल्‍पवयीन मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली.pudhari photo
Published on
Updated on

रेनापुर : तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून अल्पवयीन तीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.११) खरोळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात लहान अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहान करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध व चोरीचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारीवरून तर मुलांना मारहाण करून कायदा हातात घेतल्याप्रकरणी सचिन नारायण राऊतराव (40) व नितीन गोविंद शिंदे (38) यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून जबर मारहान केल्याच्या घटनेने खरोळासह परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा अमानुषपणे मारहाणीच्या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.

Renapur assault case
Latur Schoking News : वायर चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून अमानुष मारहाण!

रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील गट नंबर ४५० मध्ये नारायण राउतराव (४०) यांची शेती आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे अनेक दिवसापासून इलेक्ट्रिक मोटारी, बोअरच्या केबलचे वायर यासह इतर शेतीउपयोगी साहित्य चोरीला जात आहे. चोरीच्‍या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप्त व्यक्त केला जात आहे.

दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी चोरट्यांवर लक्ष ठेवले होते. शुक्रवारी नारायण राऊतराव यांच्या शेतातील बोअरचे वायर व इलेक्ट्रिक मोटारी तीन अल्पवयीन मुले चोरून नेत असल्याचे निदर्शनास आले. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पकडून त्यांची विचारपूस करून त्यांच्या विरोधात नारायण राऊतराव यांनी रेणापूर पोलिसाकडे तक्रार दाखल केली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलींसानी गुन्हाही दाखल केला . मात्र पोलिसात फिर्याद दाखल करण्यापूर्वी संबंधीत शेतकऱ्यांनी चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाच्या पोलला बांधून पाईप व वायरने अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत हे तिन्‍ही मुले गंभीर जखमी झाले.

दरम्‍यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने, रेणापूरचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक व संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधत शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.

Renapur assault case
इथे सिगारेट का पिता? म्हणत अल्पवयीन मुलाने केला ७ ते ८ वेळा चाकू खुपसून खून

या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून, त्याबाबत तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अफवा पसरविणे, दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करणे किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करणाऱ्यांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये

चोरी, मारहाण किंवा अन्य कोणताही गुन्हा घडल्यास संबंधित व्यक्तीला स्वतः शिक्षा करण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ डायल 112 किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. कायद्याची अंमलबजावणी करणे ही केवळ पोलिस यंत्रणेची जबाबदारी आहे. कायदा कोणीही हातात घेऊ नये. नागरिकांनी संयम आणि कायद्यावरील विश्वास राखावा., असे आवाहन लातूर पोलिसानी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news