

रेनापुर : तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून अल्पवयीन तीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना शनिवारी खरोळा येथे उघडकीस आली. लहान अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाणा करणाऱ्या या शेतकऱ्यांविरुद्ध व चोरीचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात रेनापुर पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. सदर अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून जबर मारहाण केल्याच्या घटनेने खरोळा परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा अमानुषपणे मारहाणीच्या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.
रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील गट नंबर ४५० मध्ये नारायण राउतराव (वय ४० वर्षे) यांची शेती आहे या परिसरातील अनेक दिवसापासून इलेक्ट्रिक मोटारी, बोअरच्या केबलचे वायर यासह इतर शेतीउपयोगी साहित्य चोरीस जात होते. सतत चोरीचे प्रकार वाढल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप्त व्यक्त केला जात होता दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी चोरट्यांवर लक्ष ठेवले होते.
शुक्रवारी नारायण राऊतराव यांच्या शेतातील तीन अल्पवयीन मुले बोअरचे वायर व इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेत असल्याचे निदर्शनास आले. इतर शेतकऱ्यांच्या मदतीन चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पकडून त्यांच्या विरोधात नारायण राऊतराव यांनी रेणापूर पोलिसाकडे तक्रार दाखल केली. त्यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोलींसानी गुन्हाही दाखल केला.ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली य सदर मुलांनी पाणबुडी मोटर , केबलचे वायर असे एकूण १६ हजार रुपयांची चोरी केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मात्र पोलीसात फिर्याद दाखल करण्यापूर्वी संबंधीत शेतकऱ्यांनी चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाच्या पोलला बांधून पाईप व वायरने अमानुषपणे मारहाण केल्यामुळे हे तिघेही मुले जखमी झाले
या प्रकरणातील मुलांना झाडाला व खांबाला बांधुन पाइपने त्यांच्या पाटीवर ,पायावर , माडीवर मारहान करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद मारहाण करणाऱ्या सचिन राउतराव , नितीन शिंदे राहणार खरोळा या शेतकऱ्याविरोधात रेनापुर पोलीसत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रेनापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.या घटनेमुळे खरोळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर अशा प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या विरोधातही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.