

उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (GMC) लातूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेला रुग्ण घेउन जात असताना एका गरोदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. १०८ रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी आणि चालकाच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे व तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुखरूप आहेत. (Latur Ambulance Emergency Delivery)
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. कविता आप्पाराव सोळंकी (वय ३० वर्षे) या गरोदर महिलेला उदगीर येथून पुढील उपचारासाठी लातूर येथे संदर्भ सेवा (Referral) देण्यात आली होती. रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ६:३० च्या सुमारास रुग्णवाहिका (क्र. MH14CL0877) देवणी ग्रामीण रुग्णालयातून येऊन रुग्णास लातूरसाठी घेऊन जात असताना कविता यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या.
स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी (EMSO) डॉ. विश्वजित शिंदे आणि पायलट (चालक) शिवलिंग स्वामी यांनी तत्काळ रुग्णवाहिका सुरक्षित ठिकाणी थांबवून वैद्यकीय उपचार सुरू केले. डॉ. विश्वजित शिंदे यांनी अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे रुग्णवाहिकेतच ही प्रसूती पार पाडली.
कविता यांनी एका निरोगी मुलीला (कन्यारत्न) जन्म दिला असून बाळाचे वजन २ किलो १६० ग्रॅम आहे. प्रसूतीनंतर आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असून, त्यांना पुढील वैद्यकीय देखभालीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे.
१०८ रुग्णवाहिका पथकाने दाखवलेले हे समयसूचकता आणि तत्परतेचे काम रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी अत्यंत मोलाचे ठरले असून, परिसरातून डॉ. विश्वजित शिंदे व पायलट शिवलिंग स्वामी यांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.