

Panchnama work of affected crops begins
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या बाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल, कृषी व पंचायत विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत सध्या तालुक्यात बाधित पिकांसह इतर सर्वच नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत ते पूर्ण झाल्यानंतर तालुक्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे व त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिली.
तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. या पावसामुळे तालुक्यात खरिपांच्या पिकांचे, शेतातील वाहून गेलेली माती, पुलांचे व रस्त्यांचे झालेले नुकसान, फळझाडांची आकडेवारी, नदीकाठचे झालेले नुकसान, पुरात वाहून गेलेले पशुधनाचे नेमके किती नुकसान झाले आहे याचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार कदम यांनी आदेशीत केल्याप्रमाणे महसूल विभागाचे तलाठी, पंचायत समितीचे ग्रामसेवक व कृषी विभागाचे कृषी सहायक हे तालुक्यात प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहेत.
रेणापूर तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४८ हजार ४७ एवढे आहे. त्यात यावर्षी ४२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ तूर १ हजार ९८४ हेक्टर, मूग ३३९ हेक्टर, उडीद १६१ हेक्टर, मका ९६ हेक्टर, तीळ १८ हेक्टर, कापूस ४९ हेक्टर अशी पेरणी झाली आहे. तालुक्यात सतत अतिवृष्टी झाल्याने वरील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी घुसून पिकांसोबतच शेतातील इतर साहित्यांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. अति पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटले असून शेतातील पिकांसह माती वाहून गेली आहे. सध्या तालुक्यात युद्धपातळीवर प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झाले व किती अनुदान अपेक्षित आहे.
याचा अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येणार आहे असे तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी सांगितले. तसेच ओढ्यावरील लहान पुलांचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन मध्ये पाणी साचल्याने बुडाला लागलेल्या शेंगा सडून त्या गळून पडत आहेत. या वर्षी सोयाबीन व इतर पिकांची पेरणीपासून आतापर्यंतचा एकरी नांगरणीचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये, बियाणांसाठी ४ ते साडेचार हजार रुपये, खतासाठी १ ते दीड हजार रुपये, कोळणी २ ते अडीच हजार रुपये, खुरपणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये, औषध फवारणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये असा एकूण पंधरा ते वीस हजार रुपयांहून अधिक खर्च आला आहे.
चांगले उत्पादन होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता शेतात काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे पेरणीसाठी केलेला खर्च, वर्षभराचा कुटुंबांचा खर्च, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न हे सर्व भागवायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने यावर्षी पीकविम्याच्या निकषामध्ये केलेल्या बदलामुळे या वर्षी शेतकऱ्यांना पीकविमा मिळेलच याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे. पेरणीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
खरिपाच्या उडीद, मूग व सोयाबीन या नगदी पिकांवरच शेतकरी वार्षिक नियोजन करीत असतो. नगदी पिकांच्या पैशातूनच रब्बीच्या पेरणीची शेतकऱ्यांना तजविज करावी लागते. यावर्षी खरीपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचा आकडा लक्षात घेऊन काँग्रेसच्या तालुका किसान सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब करमुडे यांनी रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.