

लातूर : राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत लातूर पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत १४ अपहृत मुलींसह एकूण १२१ हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ ते २२ जूनदरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ७३ हरवलेल्या महिला, ३२ हरवलेले पुरुष तसेच दोन अल्पवयीन मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले. या कामगिरीमुळे अनेक कुटुंबांना आपल्या हरवलेल्या आप्तांचा पुन्हा सहवास लाभला आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राज्यभर राबविण्यात आली. लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने काम करत अपहरण झालेल्या मुली व हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना नियमित सूचना देत कामाचा सातत्याने आढावा घेतला.
मोहिमेदरम्यान अपहरण झालेल्या १४ मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचबरोबर हरवलेल्या महिला व पुरुषांचा शोध घेण्यावरही विशेष भर देण्यात आला. त्यानुसार ७३ महिला आणि ३२ पुरुषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
याशिवाय विटभट्ट्या, हॉटेल्स तसेच सार्वजनिक ठिकाणी भटकताना किंवा मजुरी करताना आढळणाऱ्या अल्पवयीन मुलांकडेही विशेष लक्ष देण्यात आले. अशा मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याने अभिलेखावर नोंद नसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
ऑपरेशन शोध-४ अंतर्गत लातूर पोलिसांनी केलेले अथक प्रयत्न, संवेदनशील दृष्टीकोन आणि प्रभावी समन्वयामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात आनंद परत आला असून या मोहिमेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.