

Mokka against the criminal gang Shakti Gurne
लातूर, पुढारी वृत्तसेवा: सराईत गुन्हेगार शक्ती ऊर्फ योगेश अशोक गुरणे व त्याच्या टोळिविरोधात मोक्का लावण्यात आला आहे. काही दिवांसापूर्वी आकाश ऊर्फ अक्षय सुरेश सगट उर्फ सगर व इतर १० आरोपितांनी फिर्यादी अविनाश महादेव बोयणे यास देवगिरी बार येथे आम्हाला महिन्याला दोन हजार रुपये हप्ता व आमच्या मुलांना फुकट सुपारी का देत नाहीस म्हणून कत्ती, बारमधील खुर्च्याने मारहाण केली होती.
या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शक्ती उर्फ योगेश अशोक गुरुणे, इस्माईल उर्फ बाबा जलील शेख, किशोर बालाजी मस्के व आकाश उर्फ अक्षय सुरेश सकट ऊर्फ सगर यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असून हिंसाचार करणे, आर्थिक लाभाकरीता प्राणघातक हत्यारांनी सज्ज होऊन दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन घातक हत्याराने दुखापत करणे, चोरी करणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे या आरोपी विरुध्द विशेष पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परीक्षेत्र नांदेड यांच्या परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये उपरोक्त गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आलेली होती. कलमवाढ केल्यानंतर उपरोक्त चार आरोपींविरुध्द ८६० पानाचे दोषारोप पत्र लातुरच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्याची मंजुरी अपर पोलीस महासंचालक (कावसु) महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून घेण्यात आली होती.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी साहेबराव नरवाडे, पो. नि. अरविंद पवार पोलीस यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तपास कामात सपोनि बाळासाहेब डोंगरे, पोउपनि भगवान मोरे, पोलिस अंमलदार वाजीद चिकले, अंबादास पारगावे, कुंडलिक खंडागळे, शिवाजी पाटील, प्रल्हाद केंद्रे, संतोष थोरात, मोहन सुरवसे यांनी विशेष कामगिरी केली आहे.