

Students donated lakhs of rupees to farmers affected by heavy rains
लातूर, पुढारी वृत्तसेवा: अहमदपूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओले रंग या चित्र प्रदर्शनाद्वारे १ लाख, ११ हजार १११ रुपये संकलित केले व ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुपूर्द केले. चिमुकल्यांच्या या संवेदनशिलतेने मुख्यमंत्र्यांना गलबलून आले.
हे चित्र प्रदर्शन लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांसह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील 'वर्षा निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या आवाहनामुळे नाही तर पूरग्रस्तांच्या व्यथा पाहून मदतीसाठी पुढाकार घेणे ही खरी प्रेरणा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचा हा खारीचा वाटा राज्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक जाणिवा दृढ करेल, अशी भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासमोर मदत-सहकार्याचा नवा आदर्श निर्माण करणारे पाऊल असून विद्यार्थ्यांनी आपली संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि सहकार्याची भावना दाखवून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अशी भावना व्यक्त केली.
पाचवीमध्ये शिकणारी स्वरा दीपक नराळे हिने हरवलेलं सारं काही पुन्हा उभारूया या भावपूर्ण चित्रातून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी एक उदात्त संदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी या चित्रावर स्वाक्षरी केली.