

MNS marches to 'Pannageshwar' with thousands of farmers and employees
पानगाव, पुढारी वृत्तसेवा: पानगाव (ता. रेणापूर) येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. या साखर कारखान्यावर विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी (दि.११) मनसेच्या वतीने मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यात हजारो कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, शेअर्स धारक सहभागी झाले होते. सर्व थकीत पैसे मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा यावेळी बोलताना नागरगोजे यांनी दिला.
पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. हा पानगाव येथील कारखाना विमल अँग्रो लि. ने विकत घेतला आहे नवीन व्यवस्थापनाने कारखान्याचे सर्व जुने शेअर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ३५०० शेअर्सधारक सभासदांचे १४ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. ५७४ कर्मचाऱ्यांचे १२ कोटी, ५० लाख वाहतुकीचे - २ कोटी ५० लाख, शेतकऱ्यांचे थकीत ऊसाचे बिल-३ कोटी रुपये इतके देणे बाकी आहे.
नवीन व्यवस्थापन तुमचा आणि आमचा संबंध नसल्याचे सांगत असल्याने थकबाकीदारात असंतोष पसरला आहे. यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. पानगाव येथील गांधी चौकातून तो मार्गस्थ झाला.
नागरगोजे यांनी विमल अॅग्रोच्या व्यवस्थापनाला थकीत असलेली सर्व रक्कम अगोदर द्या, परप्रांतीयाकडून कारखान्यात सुरू असलेले कामे तत्काळ थांबवा, उसाचे बिल थकीत असलेल्या शेतकऱ्याच्या बिलाची रक्कम एकरकमी द्या, आणि कारखाना खुशाल सुरू करा, परंतु पैसे न देता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न कराल तर कुठल्याच स्थितीत कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला आहे.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले कारखान्याचे सरव्यवस्थापक व्यंकट वाकडे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसांत मार्ग काढला जाईल, असे उपस्थित आंदोलनकर्त्यांना सांगितले असता नागरगोजे यांनी चार दिवसांत मार्ग नाही निघाल्यास कुटुंबासह कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले.