

Farmers' stand: Not even an inch of land will be given to Shaktipeeth
औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यातील कवठा केज येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या पथकास शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे बजावत मोजणीस विरोध केला त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी न करताच परत फिरावे लागले.
शक्तिपीठ महामार्गामध्ये एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणी पथकाला सांगितले. संभाव्य महामार्ग कवठा केज या शिवारातून जात असल्याने या शक्तिपीठ महामार्गामध्ये काळी कसदार जमीन जात आहे.
आम्ही सगळे अल्प भूधारक शेतकरी आहोत. आमच्या भागातून महामार्ग होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शक्तिपीठासाठी लातूर तालुक्यातील बोपला आणि औसा तालुक्यातील कवठा अंदोरा, भेटा, नाव्होली, इत्यादी गावांचा समावेश असून आमच्या चांगल्या जमिनी या शक्तिपीठ मार्गासाठी जात असल्याने या भागातील शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी शक्तिपीठासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार केला आहे.
दरम्याम पथकास किशोर मिसाळ, गिरीधर पवार, उमेश पवार, मंचक घुटे, रामहारी पवार, बाबासाहेब मेटे, ज्ञानेश्वर घुटे, शाहूराज मिसाळ आदी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे निवेदन दिले. सीमाकंन व संयुक्त मोजणीसाठी पथकामध्ये पथकप्रमुख अजय पाटील नायब तहसीलदार तहसील कार्यालय औसा, महेश बचाटे भूमापक अधिकारी, स्वाती वाघे मंडळ अधिकारी, राम दुधभाते तलाठी कवठा केज, गजानन सावंत मोनार्च कंपनी, अशोक पिनाटे कृषी अधिकारी, एस. बोराडे शाखा अभियंता यांत्रिकी उपविभाग, भादा पोलिस ठाण्यातील कर्मचारी आदी उपस्थित होते.