

लातूर : राज्य शासनाने नव्याने गठीत केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत, पांणद रस्ता विधानसभा क्षेत्र समितीची बैठक समिती अध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मतदार संघात 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल अशा रस्त्यांना बळीराजा पाणंद रस्ते योजनेत प्राधान्य द्यावे, अशी सूचना या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड यांनी केली.
या बैठकीस लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, रेणापूर - औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी सुमित जाधव, लातूरचे श्याम गोडभरले, औसा गटविकास अधिकारी आनंद मिरकले, भूमी अभिलेख अभियंता अशोक चव्हाण, सा. बां. उपअभियंता गोबाडे, जि.प. बां. उप अभियंता एस. जी. कुलकर्णी, लेखा अधिकारी डी. एस. डांगे, कृषी अधिकारी एस. जी. कांबळे, दत्तात्र्य हाके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्त्यांची माहिती घेतली.
पहिल्या टप्प्यात एकूण 25 किलोमीटर लांबीच्या रस्ते कामात रेणापूर तालुका दहा, लातूर तालुका दहा आणि औसा तालुका पाच किलोमीटरचे काम करण्यात यावे. लातूर ग्रामीण मतदार संघात यापूर्वी झालेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांची माहिती अद्यापपर्यंत कोणत्याही योजनेमधून रस्त्यांची कामे झालेली नाही अशा सर्व रस्त्यांची माहिती संकलीत करण्यात यावी. रस्त्यांचे अतिक्रमण पोलिस विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने करावे. सदर रस्त्यांचे सीमांकन भूमी अभिलेख विभागाने तात्काळ करून देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
येत्या काळात सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, निराधारांच्या पगारी यांसह विविध योजनेचा लाभ मिळत असताना अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. तेव्हा त्यांच्या त्रुटी दूर करण्याचे काम तातडीने करावे गायगोठे, विहिरी यासह विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून कोणाचीही अडवणूक आणि पिळवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशा शब्दात आ. रमेशआप्पा कराड यांनी बैठकीत सूचना दिल्या.
प्रारंभी रोहिणी नऱ्हे यांनी शेत पाणंद रस्ता योजने संदर्भात शासन निर्णयाची माहिती देऊन लातूर रेणापूर तालुक्यासह भादा सर्कलमध्ये एकूण 1143 विविध शेत पाणंद रस्ते असून त्यात गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते 768 आणि नोंद नसलेले 375 रस्ते असल्याची माहिती दिली.