

Maratha Reservation protest ahmadpur dead body jarange patil andolan
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव कामखेड येथील विजय घोगरे यांचा दि.३० ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर विजय घोगरे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेत असताना अहमदपूर येथील शिवाजी चौकात आयोजित शोकसभेत त्यांच्या मृतदेहासह मराठा बांधवांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या मांडला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मुंबई येथे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व ाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये सबंध महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव एकत्रित आले आहेत. अहमदपूर तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी सदरील आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यात अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव कामखेड येथील युवक विजय घोगरे हे देखील सहभागी झाले होते. दिनांक ३० ऑगस्ट रोजी सदरील आंदोलनादरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजय घोगरे हे आंदोलन परिसरातील आझाद मैदानाच्या आसपास असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मराठा बांधवांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की, त्यांनी विजय घोगरे यांचे पार्थिव अहमदपूर येथील शिवाजी चौकातून विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय किंबहुना मुख्यमंत्र्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हलवणार नाही व अंत्यसंस्कार ही करणार नाही अशी कठोर भूमिका घेतली.
आंदोलकांच्या या संतप्त भावना ऐकून घेण्यासाठी अहमदपूरच्या तहसीलदार श्रीमती उज्वला पांगरकर या दुपारी तीनच्या दरम्यान आंदोलन स्थळी स्वतः उपस्थित झाल्या. त्यांनी मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेतानाच त्यांचे निवेदनही स्वीकारले. त्यानंतर काही वेळात त्यांनी विजय घोगरे यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू तसेच शासनाकडून भरीव आर्थिक मदत देऊ असे आश्वासन दिल्यानंतर मराठा बांधवांनी आपले आंदोलन स्थगित केले. व साधारणतः साडेचार वाजण्याच्या सुमारास विजय घोगरे यांचे पार्थिव अहमदपूर येथून त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आले.