Latur Heavy Rain : पावसाचा तडाखा, २०० घरांची पडझड, आर्थिक भरपाईची मागणी
Heavy rains cause collapse of 200 houses
चाकूर, पुढारी वृतसेवा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून तालुक्यातील अनेक भागांतील शेतकरी, सामान्यांना फटका बसल्याने विविध गावांतील २०० घरांच्या भिंती कोसळून पडझड झाल्याने सामान्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, दरम्यान नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
चाकूर तालुक्याला बुधवार २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान पावसाच्या मुसळधार आणि संतातधारीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना तडाखा बसला आहे. यामध्ये तालुक्यातील झरी बु. येथील ०६, नायगाव ०५, हाडोळी २४, रोहिणा ०४, घरणी १७, शेळगांव १७, जढाळा ११, मष्णेरवाडी ०८, बेलगाव ०३, हिंपळनेर ०५, वडगाव एक्की ०६, कलकोटी १४, दळ वेवाडी ०२, सांडोळ ०२, रामवाडी ०१, उजळंब ०५, कबनसांगवी ०१, कडमुळी ०१, सुगाव ०३, दपक्याळ ०१, कवठाळी ०१, राच्चनावाडी ०८, देवांग्रा ०१, देवांग्रवाडी ०१, रायवाडी ०२, अजनसोंडा खु.०१, अजनसोंडा बु. ०१, कबनसांगवी ०१, मोहनाळ ०१, आनंदवाडी १०, डोंग्रज ०४, माहूरवाडी ०२, चाकूर शहर ०७, हणमंत जवळगा ०३, आटोळा ०१, घारोळा ०१, महांडोळ ०२, बनसावरगाव ०१ आदी गावातील जवळपास २०० नागरिकांच्या घरांच्या भिंती मुसळधार पावसाने कोसळल्यामुळे सामान्यांच्या घराचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या पावसाने शेतकऱ्यांची खरीपाची उभी पीके आडवी झाल्यामुळे शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. संततधारीमुळे तालुक्यातील २०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाने दिली आहे. आणखीन काही नागरिकांनी त्यांच्या घराची पडझड झाल्याचे तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाला कळविले नाही. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी आणखीन आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाने नागरिकांच्या कच्च्या घरांच्या पडझडीची ग्राम महसूल अधिकारी यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल तहसील नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पाठविले आहे. दरम्यान तहसीलदार यांनी संबंधित विभागाकडे नुकसानीचे मूल्यांकन करून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करुन तत्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

