

Heavy rains in Ausa taluka inundate thousands of hectares of crops
औसा, पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण औसा तालुक्यात सर्वदूर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो हेक्टर खरीप पिकांमध्ये पाणी गेल्याने, तर काही ठिकाणी पिकासह माती वाहन गेल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. परवा रात्रभर तर गुरुवारी (२८ ऑगस्ट) दिवसभर पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
औसा ते अलमला आणि उबडगा, औसा-सारोळा एरंडी ते बुधोडा, जवळगा पोमादेवी पासून हसलगन, लातूर-हिप्परस-ोगा, गुळखेडा व रिंगणी-गुळखेडावाडी, भादा वरवडा शिवली अशा अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात काही ठिकाणी रस्त्याची व पुलाची कामे सुरू असल्याने अनेक गावांतील पुलांची उंची कमी असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक महिलांसह शालेय विद्यार्थी आणि गौरी-गणपतीचा उत्सव सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातून सणासुदीच्या खरेदीसाठी औसा येथे येणाऱ्या नागरिकांचे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तालुक्यातील सर्व प्रकल्प व पाझर तलाव आणि लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तावरजा सह खुटेगाव, दापेगाव, कारला, तपसे चिचोली, जोगन चिंचोली, तावशी ताड, सारोळा हे तलाव पूर्णतः भरले असून पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
खरीप पिकाचे प्रचंड नुकसान
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतातील पिकात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, उडीद ही पिके धोक्यात आली असून काढणीसाठी आलेल्या मुगाचे पीक हातातून निसटले आहे. तर तुरीच्या पिकात पाणी लागल्यामुळे संपूर्ण पानांची गळती होऊन पाने पिवळी पडत आहेत. केळी, ऊस ही पिके आडवी पडली आहेत तर भाजीपाला वर्गीय पिकाचे पण मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची कृषी विभाग आणि महसूल विभागाने तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यावर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घासही निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जाणार असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये भीती पसरली आहे.