

Mahayuti, Mahavikas Aghadi split over symbol?
शहाजी पवार
लातूर: जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पाच शहरांमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज सोमवार शेवटचा दिवस आहे. स्थानिक पातळीवर महायुती व महाविकास आघाडीमधील राजकीय पक्षांच्या युती संदर्भात बैठकांवर बैठका होत असल्या तरी महायुती अथवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? असा पेच निर्माण झाल्याने महायुती व महाविकास आघाडीत "बिघाडी" झाल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. लातूर जिल्ह्यात निवडून येण्याची ताकद असलेल्या मित्रपक्षासोबत युती करण्याचा निर्णय काँग्रेस व भाजप या तुल्यबळ पक्षांनी घेतल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यात चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून उमेदवारी दाखल करण्यास एक दिवस शिल्लक राहिला असताना स्थानिक पातळीवर अद्याप महाविकास आघाडी व महायुती होणार की नाही याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. रविवारी सायंकाळपर्यंत महायुतीतील मित्र पक्षांची आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची पाचही शहरांतील जागा वाटपा संदर्भात बैठका सुरू होत्या. प्रत्येक प्रभागात तीन सदस्य आहेत. त्यामुळे युतीतील सदस्य कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? असा प्रश्न महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षांना पडला आहे. त्यावर एकमत होत नसल्याने स्वबळाचे नारे दिले जात आहेत. तर काही ठिकाणी महायुती अथवा महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे मात्र जागा वाटपावरून घोडे आडल्याचे समजते.
उदगीर नगरपरिषद निवडणुकीत वीस प्रभागांमधून ४० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. तेथे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत युती केली आहे तर शिवसेना (शिंदे) स्वतंत्र लढणार आहे. तसेच काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना युतीच्या चर्चेत असून युती न झाल्यास ते थेड़ी महाविकास आघाडी स्वबळावर लढताना दिसेल. औसा नगरपरिषदेत ११ प्रभागांमध्ये २३ जागांसाठी लढत होणार आहे. तेथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची तुल्यबळ ताकद असल्याने महायुती
तुटल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपाने शिवसेनेला (शिंदे) सोबत घेतले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र लढणार आहे तर महायुती विरोधात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रबादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे यांची आघाडी असल्याचे निश्चित झाले आहे. निलंगा शहरात ११ प्रभागांमधून २३ जागांसाठी लढत होणार आहे. भाजपने तेथे। स्वबळाचा नारा दिला आहे, परंतु युतीची चर्चा चालू असल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदे सेनेला सोबत घेण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने स्वचळावर तयारी केली आहे. मात्र ठाकरेंच्या शिव सेनेसोबत युतीची चर्चा सुरू ठेवली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. अहमदपूर शहरामध्ये ९२ प्रभागांमधून २५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. भाजपने शिंदे शिवसेनेसोबत युतीची चर्चा चालू ठेवली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने NGO स्वबळाची तयारी केली आहे. तर फाटाफुट झालेल्या भाजप व राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी कायम ठेवली आहे. रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. तेथे भाजप व काँग्रेसमध्ये समोरासमोर लढत होणार असल्याचे दिसते. विशेष म्हणजे महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा देत दंड थोपडल्याने सर्वजण आमने-सामने दिसण्याची शक्यता आहे. भाजप व शिंदे शिवसेनेसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू असल्याचे वृत्त असून एकमत झाल्यास दोघांमध्ये युती होऊ शकते.
नगरसेवक पदासाठी ५९४ जणांची उमेदवारी
जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत रविवारी सायंकाळपर्यंत एकूण ५९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ४२ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उदगीर नगरपरिषदेत १३, अहमदपूर ४, औसा १, निलंगा १८, रेणापूर ६ उमेदवारी अर्ज आले आहेत. तर नगरसेवक पदासाठी उदगीर नगरपरिषदेत १८६, अहमदपूर ५९, औसा ५८, निलंगा ९०, रेणापूर ९० उमेदवारी अर्ज आले आहेत.