

Sorghum kadaba prices increased
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : रेणापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचा ज्वारीचा कडबा भिजून खराब झाला तर नदी काठच्या अनेक शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी पुरात वाहून गेल्या त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असुन वाळलेल्या ज्वारीच्या कडब्याला दहा ते पंधरा रुपये प्रति किलो तर एक पेंडी ४० ते ५० रुपये दराने विकली जात आहे.
वाळलेला कडवा जनावरांसाठी पोषक असतो त्यामुळे अशा वाळलेल्या चाऱ्याला सतत मागणी असते यापूर्वी वाळलेला ज्वारीचा कडबा वजन करून विकला जात नव्हता. परंतु आता इतर शेतमाला प्रमाणेच ज्वारीचा कडबाही तोला मोलाने (किलोवर) विकला जात आहे.
रेणापूर तालुक्यात मागील दोन तीन महिन्यांत विक्रमी पाऊस झाला त्यात नदी नाल्यांना मोठे पूर आले या पुरामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले अनेकांचा ज्वारीचा कडबा पावसात भिजला तर काहीच्या गंजी पुरात वाहून गेल्या परिणामी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे दुग्ध व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. वाळलेला कडबा प्रति पेंडी ४० ते ५० रुपये तर प्रति किलो १० ते १५ रुपये दराने विकला जात आहे या महागाईने दुग्ध व्यावसायिकांसमोर पशुधन ठेवावे की विकावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळलेला कडबा शेकडा तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत मिळत होता. एका पेंडीला तीस ते पस्तीस रुपये मोजावे लागत होते. कडब्याचे भाव भडकल्याने चारा म्हणून हरभरा व सोयाबीनच्या गुळ्याचा वापर पशुपालक करीत आहेत.
हिरवा चारा म्हणून मक्याचा वापर काही पशुपालक करीत आहेत. चारा व पशुखाद्याच्या भाववाढीने पशुधन जगविणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे. पैसे देऊनही हिरवा चारा मिळत नाही. आता कारखाने सुरू झाले आहेत उसाच्या वाड्याचा चारा म्हणुन उपयोग करता येणार आहे चाऱ्याची टंचाई जाणवू नये म्हणून ऊसउत्पादक शेतकरी चारा म्हणून उसाचे वाडे जमा करून त्याच्या गंजी लावून ठेवतात. चारा टंचाईच्या कालावधीत त्याचा उपयोग
एकेकाळी रेणापूर तालुक्यातून हजारो लिटर दूध डेअरीला जात असे, त्यातून शेतकऱ्यांच्या हाती येणारा नगदी पैसा कमी होत चालला आहे. शेतीवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. सध्या बाजारात सरकी पेंड, सुग्रास व इतर पशुखाद्याचे दर वाढत आहेत आता दलालांमार्फत वाळलेला कडबा पशुपालकांना घरपोच मिळत आहे त्यामुळे पशुपालकांची सोय झाली आहे. एकीकडे सतत कडब्याचे भाव वाढत असतात तर दुसरीकडे ज्वारीला भाव मिळत नाही ज्वारीचे खळे करणे अवघड होत आहे. त्यामुळे तालुक्यात ज्वारीचा पेरा कमी होत चालला आहे त्याचाही परिणाम कडब्याच्या वाढत्या किमतीवर होताना दिसत आहे.