

जाफराबाद : येथील महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या निराधारांसह इतर लाभार्थी खातेदारांना बँकेत आल्यानंतर दीड ते दोन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेषतः वृद्ध व महिला लाभार्थ्याची सकाळपासूनच बँकेत गर्दी असते. अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील महाराष्ट्र बँकेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने व्यवहारांना मोठा विलंब होत आहे. कॅशियरच्या निष्काळजीपणामुळे वृध्द व गोरगरीब लाभार्थ्याना रांगेत तासोन तास उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून ऐकावयास मिळत आहे. दीर्घकाळ उभे राहिल्याने अनेक वृध्दांची प्रकृती बिघडल्याचे प्रकारही घडत आहेत.
निराधार योजनेची रक्कम हीच अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने पैसे मिळेपर्यंत लाभार्थी कित्येक तास रांगेत उभे राहत आहेत. कॅशियरकडे विचारणा केली असता, “एटीएम आहे, बाहेरून पैसे काढा,” असे उत्तर त्यांच्याकडून दिले जात असल्याचा आरोप खातेदारांकडून होत आहे. अनेक वृद्धांकडे एटीएम कार्ड नसून, अंगठ्याचा ठसा व्यवस्थित येत नसल्याने एटीएममधून पैसे काढणे नसल्यानेच ते बँकेत येत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर बँक व्यवस्थापनाने निराधार लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र काऊंटर सुरू करावे, टोकन पद्धत राबवावी तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक व लाभार्थ्यांकडून होत आहे.
जाफराबाद येथील महाराष्ट्र बँक शाखेंतर्गत 14 गावे येत असून खातेदारांची संख्या मोठी आहे. सध्या शाखेत एक कॅशियर व एक क्लर्कची संख्या कमी आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खातेदारांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे असे शाखा व्यवस्थापक झारखंड यांनी सांगितले.