

नितीन थोरात
वैजापूर : तालुक्यातील जातेगाव येथे असलेले आरोग्य उपकेंद्र गेल्या तब्बल वीस वर्षांपासून डॉक्टरांविना सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग््राामीण भागातील नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य सेवेसाठी उभारण्यात आलेले हे उपकेंद्र आज केवळ नावापुरतेच उरले असून, शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे माजी.आरोग्य सभापतींच्या गटात आरोग्य केंद्र सलाईनवरच असल्याचे दिसून येत आहे.
जातेगाव व परिसरातील नागरिकांसाठी हे उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र येथे कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने आजारपणाच्या किरकोळ तक्रारींसाठीही रुग्णांना वैजापूर किंवा संभाजीनगर गाठावे लागत आहे. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थकि बोजा वाढत असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या उपकेंद्राची इमारतही अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे.
उपकेंद्राच्या अनेक काचा फुटलेल्या असून, पावसाळ्यात व हिवाळ्यात रुग्ण व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या उपकेंद्रातील एका खोलीत सध्या पोस्टमनचे (टपाल कार्यालयाचे) कामकाज सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य सेवेसाठी असलेली जागा इतर शासकीय कामांसाठी वापरली जात असल्याने उपकेंद्राच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. कागदोपत्री उपकेंद्र कार्यरत असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात डॉक्टरांची नियुक्ती नसणे, अपुऱ्या सुविधा आणि इमारतीची दुरवस्था यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे.
गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच आपत्कालीन रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्राथमिक उपचारांची सुविधा नसल्याने अनेकदा रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तर माजी आरोग्य सभापती यांच्या जिल्हा परिषद गटातील हे उपकेंद्र असल्याने नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे.
डॉक्टरांकडे अतिरिक्त भार
सध्या उपकेंद्रात एक सिस्टर आणि एक बहुउद्देशीय कामगार व सामुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. उपकेंद्र सुरू आहे ; उपकेंद्रामध्ये नियमित लसीकरण व औषध उपचार होतात, मात्र डॉक्टरांकडे अतिरिक्त शिरसगाव येथील कार्यभार आहे. यामुळे आठवड्यातील काही दिवस त्यांना शिरसगाव येथे काम पहावे लागत आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य वरवे दिली.
गावातले नागरिक काय म्हणाले?
हे गाव एकेकाळी आरोग्य सभापती राहिलेल्या अविनाश गलांडे यांच्या महालगाव गटातील आहे. गेल्या वीस वर्षांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित डॉक्टरच नाही. काही नागरिकांनी तर डॉक्टर फक्त फोटो काढण्यासाठीच येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी दै.पुढारीच्या प्रतिनिधीची बोलताना सांगितले. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचा गंभीर निष्काळजीपणा उघड झाला केला आहे.