

Mahavitaran employees cut down trees without permission while erecting new electricity poles
औराद शहाजानी, पुढारी वृत्तसेवा : सध्या जिल्हाभरात महावितरणकडून वीज पुरवठा करण्यासाठी तसेच नव्याने उभारलेल्या सोलार प्लांट पासून पॉवर हाऊस पर्यंत नवीन लाईन रस्त्याच्या कडेने ओढल्या जात आहेत. ती ओढताना महावितरणचे कंत्राटदार अगोदर खांब रोवतात व त्यानंतर तार ओढली जाते. हे करताना रस्त्याकडेच्या झाडांची खात्री न करताच सरळ रेषेत खांबे रोवत असून दोन खांबांच्या मध्ये येणारी झाडे कापली जात आहेत. कहर म्हणजे या वृक्षतोडीसाठी महावितरणने कसलीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद ते शेळगी, शेळगी ते ताडमुगळी, ताडमुगळी ते कासार बालकुंदा व तांबाळा पाटी ते तांबाळा गाव या रस्त्यावर असलेल्या अनेक झाडांची कत्तल महावितरणकडून करण्यात आ लेली आहे. काही भागात सध्या केवळ खांब रोवले आहेत, पुढे तार ओढताना तेथील अनेक वर्षापासूनची जुनी वृक्षे तोडली जाणार आहेत. भविष्यातही ही झाडे वाढली तर पुन्हा तारांना लागत आहेत म्हणून त्याची तोड केली जाईल.
अशीच स्थिती चाकूर तालुक्यातील नळेगाव ते शिवपूर रस्त्यावर दिसून येत आहे. देवणी तालुक्यात देवणी ते तोगरी मोड या रस्त्यावर शनिवार १९ जुलै रोजी महावितरणने नवीन लाईन ओढण्याचे काम सुरू केले आहे.
त्याचे कंत्राट अशोक बिल्डकॉन या कंपनीला दिलेले असून या कंत्राटदाराने खांबे रोवताना अनेक झाडांची विनापरवानगी तोड केलेली आहे. त्यावेळी कंत्राटदाराला झाडे तोडण्याच्या परवानगीची मागणी केली असता त्याने अशी परवानगी नसल्याचे सांगितले.