

लातूर: अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीनंतर 'जशास तसे उत्तर देऊ,' अशी आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे आपला आणि कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला, त्यातूनच हे कृत्य घडले, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. "मी एका शेतकऱ्याचा मुलगा असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे," असेही ते म्हणाले.
घडलेल्या प्रकाराबद्दल मनात कोणताही किंतु न ठेवता आपण छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे-पाटील यांची लवकरच भेट घेणार आहोत. त्यांच्या मनात आमच्याविषयी निर्माण झालेले गैरसमज दूर करून हे प्रकरण सामोपचाराने मिटवणार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या मारहाण प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेवर टीका झाल्यानंतर त्यांनी आता सामंजस्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.