

लातूर : राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपये दिवाळी अग्रिम मदतीपैकी ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ९६१ शेतकऱ्यांना १९० कोटी ९८ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी गुरुवारी (दि. ६) दिली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया राबवून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत रक्कम जमा केली.छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांतील ३३ लाख ३६ हजार ३६० शेतकऱ्यांना एकूण १ हजार ६६८ कोटी १८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
त्यात लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ९६१ शेतकऱ्यांना १९० कोटी ९८ लाख, धाराशिवमधील ३ लाख ४७ हजार ७२ शेतकऱ्यांना १७३ कोटी ५४ लाख, बीडमधील ६ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ५ लाख आणि नांदेडमधील ५ लाख ६२ हजार ८६८ शेतकऱ्यांना २८१ कोटी ४३ लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही मदत वितरित करण्यात आली आहे.काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी आणि अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे.
अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून उर्वरित पात्रांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.