

गेवराई : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असून, त्यांच्या परतफेडीच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत संस्थेच्या ४१ शाखांचे पंचनामे करून त्या ताब्यात घेण्यात आल्या असून, थकीत कर्जदार आणि जामीनदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियमांतर्गत संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली असून, त्यांच्या विक्रीसाठी विशेष न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
यासंदर्भात ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अवसायक यांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखी पत्राद्वारे वंचित बहुजन आघाडीचे माजी गेवराई तालुकाध्यक्ष अजयकुमार उर्फ पप्पू गायकवाड यांना माहिती दिली आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, यासाठी गायकवाड यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच उपजिल्हाधिकारी (एमपीआयडी) कार्यालयाकडे निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता.
अवसायक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थेवर अवसायकाची नियुक्ती झाल्यानंतर बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ मधील तरतुदींनुसार कार्यवाही सुरू आहे. संस्थेच्या ४१ शाखांचे पंचनामे करून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. थकीत कर्जदार व जामीनदारांना कर्जफेडीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून, कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, एमपीआयडी कायद्यांतर्गत संस्थेचे तत्कालीन संचालक, पदाधिकारी आणि संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांच्या परतफेडीसाठी निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने बीडचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (एमपीआयडी) यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालमत्ता विक्रीसाठी विशेष न्यायालयाकडे परवानगीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
याशिवाय, सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) या प्रकरणाचा तपास सुरू असून, ईडीने जप्त केलेल्या मालमत्ता अवसायकाच्या ताब्यात मिळाव्यात यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि संबंधित व्यक्तींविरोधात विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. कर्जवसुली, जप्त मालमत्तांची विक्री आणि न्यायालयीन प्रक्रियेतून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या आधारे ठेवीदारांची रक्कम परत केली जाणार असल्याचे अवसायक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रशासकीय स्तरावर यश आल्याची प्रतिक्रिया अजयकुमार उर्फ पप्पू गायकवाड यांनी व्यक्त केली. मात्र, जप्त मालमत्तांची विक्री होऊन ठेवीदारांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा होणे महत्त्वाचे असून, परतफेडीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा ठेवीदारांकडून व्यक्त होत आहे.