

Lawyer beaten up by police in front of court in Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा : वारंवार सांगूनही तू माझ्या विरोधात वकीलपत्र का घेतोस? असे म्हणत एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पोलीस असलेल्या मुलाने व अन्य दोघांनी थेट न्यायकक्षाच्या दरवाजासमोरच एका वकिलाला मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या न्यायालय परिसरात घडली.
चाकूर येथील रहिवासी असलेले अॅड. कोंडीबा धोंगडे (वय ४८) हे या घटनेतील पीडित वकील आहेत. चापोली येथील प्रकरणासंदर्भात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, लातूर येथे न्यायालयात कामकाज करीत असताना, विरोधी पक्षकार फारूखमियाँ अफजलमियाँ देशमुख (सेवानिवृत्त ए.एस.आय.), त्यांचा मुलगा रियाज फारूखमियाँ देशमुख (पोलीस कर्मचारी), महेफुज विकार जहागीरदार (रा. नळेगाव) आणि बड्डू शंकर जोशी (रा. चापोली) यांनी अॅड. धोंगडे यांना न्यायालय कक्षातच अरेरावीची भाषा वापरून विरोध केला.
यादरम्यान रियाज फारूखमियाँ देशमुख याने, "मी पोलीस खात्यात नोकरीस आहे, तुला तर रिव्हॉल्व्हरने गोळी घालून खतम करेन. मी सध्या माजी मंत्री संजय बनसोडे साहेबाचा सुरक्षा रक्षक असून माझं कोणीही वाकडे करू शकत नाही," असे म्हणत "तुला खतम केल्याशिवाय आमच्यासारखा निकाल लागणार नाही," अशी धमकी दिली.
गोळी मारण्याची धमकी
प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर अॅड. धोंगडे हे न्यायकक्षाच्या दरवाजासमोर आले असता, रियाज याने, "तुला हजार वेळेस सांगूनही तू माझ्या प्रकरणात वकीलपत्र घेऊन माझ्या विरोधात का काम करत आहेस?" असे म्हणून अॅड. धोंगडे यांच्या गच्चीला धरून तोंडावर दोन चापटा मारल्या. याचवेळी फारूखमियाँ देशमुख यांनी पाठीमागून येऊन हात धरले, तर महेफुज व बंडू जोशी यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.