

Shivraj Patil Passes Away:
लातूर : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (वय 91) यांचे लातूर येथे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूर येथील त्यांचे निवासस्थान देवघर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. ते लातूरचे नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अचंबा वाटावा असाच आहे. लातूर येथील विधी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले होते. काँग्रेसकडून राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते, ऐनवेळी प्रतिभाताई पाटील यांचे नाव पुढे आल्याने त्यांची संधी हुकली होती. सर्वच पक्षात त्यांचा सन्मान होता. लातूर येथे ते भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवत होते. अटल बिहारी वाजपेयी यांची लातूरात सभा झाली होती, त्यावेळी वाजपेयी यांच्या तोंडून शिवराज पाटील अच्छे आदमी है, असे विधान केले होते. ती निवडणूक पाटील यांनी जिंकली होती.
नगराध्यक्ष लातूर - 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970
आमदार लातूर - 1972 ते 1980
विधानसभा उपाध्यक्ष - 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978
विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र - 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979
लोकसभा सदस्य, लातूर - 1980 ते 2004
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री - 1980 ते 1982
केंद्रीय वाणिज्य मंत्री - 1982 ते 1983
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री - 1983 ते 1984
लोकसभा उपसभापती - 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991
लोकसभा सभापती - 10 जुलै 1991 ते 22 मे 1996
केंद्रीय गृहमंत्री - 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008
राज्यसभा सदस्य - 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010
पंजाब राज्यपाल - 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015