

परतूर, पुढारी वृत्तसेवा
महावितरणच्या गलथान कारभाराचा परतूरच्या ग्राहकाला ८४,६३० रुपयांचा शॉक बसला आहे. अवास्त्व बिल पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊनही, या सरकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका कायम ठेवली आहे. गोकुळनगर येथील रहिवासी रामेश्वर हरिभाऊ सवणे यांच्या घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवलेली असतानाही त्यांना हे भरमसाठ बिल मिळाले होते. याबाबत आंदोलनाचा इशारा देऊनही, महावितरणने बिलाची दुरुस्ती सोडाच, साधे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखवले नसल्याचा आरोप रामेश्वर सवने या ग्राहकाने केला आहे.
दरम्यान, रामेश्वर सवणे (ग्राहक क्र. ५२४०११७१२२४९) यांनी वीज बचत करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी सौर यंत्रणा बसवली. मात्र, महावितरणच्या नेटकऱ्यांनी त्यांच्या सौर ग्रीडमध्ये जमा झालेल्या युनिट्सची कोणतीही नोंद न घेता आणि पूर्वी भरलेल्या ५० हजार रुपयांच्या बिलाचा हिशोब न पाहता, थेट ८४,६३० रुपये भरण्याची मागणी केली.
या चुकीच्या बिलाची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२५ होती. सवणे यांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आणि आठ दिवसांत बिल दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा तसेच थेट ग्राहक मंचात दाद मागण्याचा स्पष्ट इशारा दिला होता.
दैनिक पुढारीमध्ये बातमी छापून येऊन या प्रकरणाला वाचा फुटली, मात्र नाद नको या आविर्भावात असलेल्या महावितरणच्या स्थानिक शहर अभियंता आणि उपविभाग अधिकाऱ्यांनी सवणेंच्या तक्रारीला संपूर्णपणे केराची टोपली दाखवली. आठ दिवसांची मुदत उलटूनही बिलाची दुरुस्ती झाली नाही, ना ग्राहकाला समाधानकारक उत्तर मिळाले. यावरून, महावितरणला सामान्य ग्राहकांच्या तक्रारीची आणि त्यांच्या आर्थिक नुकसानीची किती किंमत आहे, हे स्पष्ट होते.
८४ हजारांचे अवास्तव बिल देयक
महावितरणच्या या मनमानी आणि असंवेदनशील कारभारामुळे सौर ऊर्जा वापरून बचत करू पाहणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. ८४ हजार रुपयांचे अवास्तव बिल आणि त्यावर महावितरणचे मौन, यामुळे परतूरमधील वीज ग्राहक संतप्त झाले आहे. महावितरणने तातडीने या बिलाची दुरुस्ती करून ग्राहकाला न्याय न दिल्यास, ग्राहक आंदोलनाचे नाहीतर करावाईचे स्फोटक स्वरूप महावितरणच्या कार्यालयास पाहायला मिळू शकते !