

छत्रपती संभाजीनगर : एक कोटी एक्क्यांशी लाख रुपयांच्या थकीत जीएसटी वसुलीसाठी गंगापूर येथील एका व्यापाऱ्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यास वारंवार नोटीस बजावूनही कराचा भरणा न केल्याने अखेर जप्तीची कारवाई केल्याची माहिती अपर राज्यकर आयुक्त अभिजीत राऊत यांनी दिली.
राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून थकीत जीएसटी कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मागील आठवड्यात थकीत कर वसुलीसाठी कन्नड येथील एका व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त केली होती. आता अशी धडक कारवाई राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून ता. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यापाऱ्यावर करण्यात आली आहे.
या व्यापाऱ्याकडे एक कोटी एक्क्यांशी लाख सहा हजार आठशे बत्तीस रुपये कर थकबाकी प्रलंबित होती. वारंवार नोटीस बजावूनही कराचा भरणा करण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेर विभागाने साडेसहा एकर जमीन जप्तीची कारवाई केली.
अपर राज्यकर आयुक्त अभिजीत राऊत, राज्यकर उपायुक्त चंद्रशेखर बोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त संजीव नागरगोजे, राज्यकर निरीक्षक अर्चना हामकडे, राज्यकर निरीक्षक कोमल ढवण, कर सहायक किशोर कवडे यांनी ही कारवाई केली.
नियमित कर भरा, अन्यथा कारवाई
राज्य कर विभागाने करदात्यांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा थकीत जीएसटी कर वसुलीसाठी थकबाकीदाराविरुद्ध पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.